'आजी: कुटुंबाचं आगळ' पाठ झाला जिवंत! कोथरूडच्या महेश विद्यालयातील उपक्रमाने जिंकली सर्वांची मने
पुणे | प्रतिनिधी कोथरूड येथील महेश विद्यालयात इयत्ता दहावीच्या मराठी विषयातील "आजी: कुटुंबाचं आगळ" या पाठाचे लेखक डॉ. महेंद्र कदम यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित संवाद कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांसाठी अविस्मरणीय ठरला. पाठातील आशय विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचावा यासाठी शाळेने केलेले सर्जनशील नियोजन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे होते. कार्यक्रमस्थळी पारंपरिक वाडा, त्याचे भव्य दरवाजे आणि 'आगळ' यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठातील वातावरण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. या देखण्या सादरीकरणामुळे साहित्याचा अनुभव अधिक जिवंत आणि प्रभावी झाला. कार्यक्रमातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी डॉ. महेंद्र कदम यांची घेतलेली मुलाखत. विद्यार्थ्यांनी अत्यंत नेमके, अभ्यासपूर्ण आणि विचारांना चालना देणारे प्रश्न विचारत संवाद अधिक अर्थपूर्ण केला. सलग दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने सहभागी झाले होते. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने आणि उत्स्फूर्त सहभागाने उपस्थितांची मने जिंकली. विद्य...