'आजी: कुटुंबाचं आगळ' पाठ झाला जिवंत! कोथरूडच्या महेश विद्यालयातील उपक्रमाने जिंकली सर्वांची मने

पुणे | प्रतिनिधी

कोथरूड येथील महेश विद्यालयात इयत्ता दहावीच्या मराठी विषयातील "आजी: कुटुंबाचं आगळ" या पाठाचे लेखक डॉ. महेंद्र कदम यांच्या विशेष उपस्थितीत आयोजित संवाद कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांसाठी अविस्मरणीय ठरला. पाठातील आशय विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचावा यासाठी शाळेने केलेले सर्जनशील नियोजन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे होते.

कार्यक्रमस्थळी पारंपरिक वाडा, त्याचे भव्य दरवाजे आणि 'आगळ' यांची प्रतिकृती उभारण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाठातील वातावरण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. या देखण्या सादरीकरणामुळे साहित्याचा अनुभव अधिक जिवंत आणि प्रभावी झाला.
कार्यक्रमातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी डॉ. महेंद्र कदम यांची घेतलेली मुलाखत. विद्यार्थ्यांनी अत्यंत नेमके, अभ्यासपूर्ण आणि विचारांना चालना देणारे प्रश्न विचारत संवाद अधिक अर्थपूर्ण केला. सलग दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी पूर्ण एकाग्रतेने सहभागी झाले होते. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने आणि उत्स्फूर्त सहभागाने उपस्थितांची मने जिंकली.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अजोतीकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी आणि देखणे नियोजन केले होते. विशेष म्हणजे संस्थेचे अध्यक्ष, सचिव तसेच सर्व संचालक मंडळाचे सदस्य या उपक्रमाला उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
यावेळी डॉ. महेंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत वाचन, आकलन आणि चिकित्सक विचारांच्या महत्त्वावर भर दिला. आजच्या पिढीचे वाचन तुलनेने कमी असले, तरी त्यांची आकलनशक्ती, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि विचार करण्याची क्षमता उल्लेखनीय असल्याचे त्यांनी नमूद केले. योग्य दिशा आणि प्रेरणा मिळाल्यास ही पिढी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महेश विद्यालयाने साहित्य अध्यापनाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देत विद्यार्थ्यांमध्ये विचार, संवाद आणि संवेदनशीलता जागविणारा आदर्श उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी विद्यालयाचे कौतुक केले.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

" ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची एस.एस.सी. परीक्षेच्या १०० % निकालाची परंपरा कायम "

"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेची राज्यस्तरीय शालेय डाॅजबाॅल स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी"