"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात एक दिवसीय ऊस किड व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न"
केडगांव ( वार्ताहर ) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्नित नेताजी शिक्षण संस्थेचे सुभाष बाबुराव कुल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, केडगाव, विद्यार्थी विकास मंडळ व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी एक दिवसीय ऊस किड व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेअंतर्गत प्रथम सत्रामध्ये मा.श्री कांतीलाल रणदिवे (सेंद्रिय शेती अभ्यासक व प्रगतशील शेतकरी) यांनी ऊस किड व्यवस्थापन आणि गुळ प्रक्रिया या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी सेंद्रिय ऊस शेतीचे महत्व, मशागतीचे प्रकार, घरगुती रोपवाटिका, ऊस पिकाला पाणी देण्याची वेळ व वारंवारिता या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच रासायनिक शेतीचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर कसे होतात याचे विवेचन केले, ऊस पिकावर पडणाऱ्या खोडकिडा, पिठ्या ढेकूण, लोकरी मावा, हुमणी या किडींच्या संदर्भात कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय पद्धतीने कसे उपाय करावेत यासंबंधी सखोल माहिती दिली. ऊस कीड व्यवस्थापनासाठी चुन्याची निवळी,गावरान तंबाखूचे मिश...