"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात एक दिवसीय ऊस किड व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न"

केडगांव ( वार्ताहर ) :
                  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्नित नेताजी शिक्षण संस्थेचे सुभाष बाबुराव कुल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, केडगाव, विद्यार्थी विकास मंडळ व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी एक दिवसीय ऊस किड व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेअंतर्गत प्रथम सत्रामध्ये मा.श्री कांतीलाल रणदिवे (सेंद्रिय शेती अभ्यासक व प्रगतशील शेतकरी) यांनी ऊस किड व्यवस्थापन आणि गुळ प्रक्रिया या विषयावर विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी सेंद्रिय ऊस शेतीचे महत्व, मशागतीचे प्रकार, घरगुती रोपवाटिका, ऊस पिकाला पाणी देण्याची वेळ व वारंवारिता या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच रासायनिक शेतीचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर कसे होतात याचे विवेचन केले, ऊस पिकावर पडणाऱ्या खोडकिडा, पिठ्या ढेकूण, लोकरी मावा, हुमणी या किडींच्या संदर्भात कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय पद्धतीने कसे उपाय करावेत यासंबंधी सखोल माहिती दिली. ऊस कीड व्यवस्थापनासाठी चुन्याची निवळी,गावरान तंबाखूचे मिश्रण, अंडी व लिंबू रसाचे मिश्रण, या सेंद्रिय औषधांबद्दल माहिती दिली. रासायनिक खतांमुळे मातीमधील सूक्ष्म जीवाणू नष्ट होतात यामुळे रासायनिक खतांचा वापर टाळून कोंबड खत, मासळी खत, काडीकचऱ्याचे कंपोस्ट खत करून जमिनीचा पोत सुधरवता येतो यासंदर्भात मार्गदर्शन केले.क्षारपड जमिनीत जिवाणूंचे प्रमाण कमी झाल्याने या जमिनीतील मातीचा सेंद्रिय कर्ब ०.५५ पासून ०.७५ पर्यंत कमी झाल्याचे त्यांनी सांगितले हा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा व शाश्वत सेंद्रिय शेती करावी असा सल्ला दिला. गुळ प्रक्रिया करताना गुळाचे शुद्धीकरणासाठी रासायनिक पध्दती टाळून सेंद्रिय पद्धतीने गूळ निर्माण केल्यास तो गुळ मानवी आरोग्यास पोषक ठरतो अशी माहिती दिली.
                  कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये कृषी पर्यवेक्षक मा.श्री अजित फराटे यांनी कृषी शासकीय योजना व ग्रामीण शेती विकास या विषयावर मार्गदर्शन केले. कृषी व ग्रामीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांसंदर्भात माहिती दिली यामध्ये प्रामुख्याने शेततळे व त्याचे अस्तरीकरण, शेडनेट व पॉली हाऊस, शीतकरण गृह, राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध योजना या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले.
                कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.जी. थोपटे यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमासाठी एकूण ८४ विद्यार्थी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्यामराव वासनीकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.अमर नांदगुडे यांनी केले.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "