" गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन आपल्यातील सामाजिक भान जपणे गरजेचे " - डॉ.श्रीराम गीत

पुणे ( वार्ताहर):
                 "दहावी बारावीचा टप्पा पार करून करिअरमध्ये यशस्वी झाल्यावर विद्यार्थ्यांनी इतर गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात देऊन आपल्यातील सामाजिक भान जपणे गरजेचे आहे " ,असे उद्गार सुप्रसिद्ध करियर कौन्सिलर डॉ. श्रीराम गीत यांनी काढले.
            जागृती महिला व बालकल्याण संस्थेने आयोजित केलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात उपस्थित विद्यार्थी व पालकांना ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करतेवेळी ते बोलत होते. दहावी, बारावीच्या वळणावरून आपल्या करिअरच्या वाटेवर विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात यशस्वी झाला, तरी त्यांनी आपल्या अवतीभवती जिथे कुठे विद्यार्थ्यांसाठी मदतीची गरज भासेल तिथे आवश्यक मदत करावी असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनाच्या वेळी विद्यार्थ्यांना सांगितले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागृती महिला व बालकल्याण संस्थेच्या वतीने दहावी आणि बारावीतील 80% च्या वर मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
             कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विश्वेश्वर बँकेचे सीईओ श्रीराम आपटे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीराम गीत यांच्या कौन्सिलिंग टीम मधील सौ.अमिता आंबेकर आणि श्री प्रकाश अवचट यांची उपस्थिती होती.
            "परीक्षेत कमी मार्क मिळाले तरी नाराज न होता आपल्या आवडीच्या विषयात अभ्यास करून यशस्वी होऊन दाखवणे हा जीवनाचा मूलभूत मंत्र आहे ",असे श्री.प्रकाश अवचट यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
         केवळ निवडक व पारंपरिक विषयांच्याच मागे सर्वांनी न लागता, स्पर्धा परीक्षा व करिअर गार्डन सारख्या  क्षेत्रातील विषयांत देखील करिअर करता येते. स्पर्धा परीक्षांमध्ये शालेय अभ्यासक्रमातील विषयच पुढे आलेले असतात. रोज पेपर वाचण्याची सवय ठेवली तर जनरल नॉलेज वाढते.असेही त्यांनी सांगितले.
             दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना केवळ इंजिनिअरिंग आणि मेडिकल सोडून इतरही वेगवेगळे आयाम उपलब्ध असतात त्याचा त्यांनी निश्चितपणे विचार करायला हवा आणि स्वतःमध्ये वेगवेगळे स्किल आत्मसात केले पाहिजे असे मा. श्रीराम आपटे यांनी आपल्या भाषणात सांगितले तसेच बँकिंग क्षेत्र आणि सायबर क्राईम या विषयातही करिअर करता येण्यासारखे आहे याची त्यांनी माहिती  दिली. जागृती महिला व बालकल्याण संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गुणवंत विद्यार्थी सत्काराच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जागृती महिला व बालकल्याण संस्थेचे अध्यक्ष अनुराधा टल्लु यांनी केले. यावेळी त्यांनी संस्थेची माहिती देऊन आजवर संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा सादर करत आजच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विशद करून मार्गदर्शन केले.
             यावेळी या परिसरातील सुमारे १५ ते  २० सरकारी आणि खाजगी शाळांमधून दहावी आणि बारावी  ८० % वरील मार्क मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेची ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव सत्कार करण्यात आला. साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी-विद्यार्थिनी आपापल्या पालकांसह या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रमोद कुलकर्णी  यांनी केले, तर आभार प्रदर्शन  सौ.दिपाली अकोलकर यांनी केले . पसायदाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी तसेच उपस्थितांपैकी काही पालकांनीही आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाच्या आयोजनाचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो असे सांगत जागृती महिला व बालकल्याण संस्थेचे आभार मानले आणि संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
              सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागृती महिला व बालकल्याण संस्थेच्या पदाधिकारी व महिलांच्या टीमने मोलाचे सहकार्य केले.यामध्ये सौ.दिपाली अकोलकर, माधवी गोडबोले ,सौ.जान्हवी जोशी ,सौ. सोनल पांडे, सौ.राजश्री बाबर ,प्राची मोकाशी, उल्का लवांडे यांचा समावेश होता.

Popular posts from this blog

"सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सर प्रफुलचंद्र रे व इस्रोचे संस्थापक डॉ. विक्रम साराभाई यांची जयंती उत्साहात साजरी"

"गणितातली कोडी उलगडण्यासाठी 'पाय' महत्त्वाचा : क. का. वाघ महाविद्यालयातील पाय दिन कार्यक्रमात प्रा.तुषार खैरनार यांचे प्रतिपादन"

"लोक माझे सांगाती- मा.बाळासाहेब आप्पा क्षिरसागर "