" खेळ रंगला पैठणीचा,जल्लोष सार्या निमगांवचा "
निमगांव केतकी ( वार्ताहर) :
जागतिक महिला दिन व गुढीपाडव्याचे औचित्य साधून निमगांव केतकी व परिसरातील माता भगिनींसाठी गुढीपाडव्यादिवशी तुषार (बाबा) जाधव मिञ परिवार यांच्या नियोजनातून तसेच श्री.देवराजभाऊ जाधव व श्री.अंकुशदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ.सोनाली तुषार जाधव यांच्या संकल्पनेतून 'न्यू होम मिनिस्टर ' कार्यक्रम आणि 'सन्मान नारीशक्तीचा' पुरस्कार वितरण सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले.ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रथमच अशाप्रकारच्या उपक्रमाचे आयोजन होत असल्यामुळे निमगांव केतकी व परिसरातील महिलावर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दररोजच्या धकाधकीच्या व व्यस्त प्रापंचिक बाबींतून महिलांना यानिमित्त जरा उसंत मिळाली. त्यामुळे महिलांनी या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद लुटला.
यावेळी निमगांव केतकी परिसरातील २५ कर्तृत्ववान महिलांचा 'सन्मान नारीशक्तीचा' हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विविध खेळांच्या माध्यमातून महिलांना लहान मोठ्या बक्षिसांचे वाटप करत सर्वांचे लाडके भाऊजी क्रांती मळेगावकर यांनी आपल्या गाणी व विनोद यांच्या मिलाफातून कार्यक्रमाला रंगत आणली.
सौ.मोनाली हेगडे या कार्यक्रमातील 'नेकलेस,नथणी आणि पैठणी ' या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या.
गावातील पुरूष वर्गही महिलांच्या या आनंदात सहभागी झाला व त्यांनीही या रंगतदार व दिमाखदार सोहळ्याचा भरपूर आनंद घेतला.