"नंदिकेश्वर प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची कृषीपुरक उद्योगांना भेट"

सराफवाडी ( वार्ताहर): इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नंदिकेश्वर प्रगती विद्यालय, सराफवाडी (ता.इंदापूर) मधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी सराफवाडी परिसरातील कृषीपूरक उद्योगांना नुकतीच भेट दिली. पुस्तकी ज्ञानाबरोबरच विविध व्यावसायिक कौशल्ये तसेच उद्योजकीय कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत व्हावीत म्हणून या भेटीचे आयोजन केल्याचे विज्ञान शिक्षक श्री.नलवडे आर.एन. आणि श्रीमती बरळ जे.एम. यांनी सांगितले. यावेळी सराफवाडी गावातील शेतकरी श्री.भारत अभंग यांच्या रेशीम उद्योग प्रकल्पाला विद्यार्थ्यांनी भेट दिली आणि रेशीम उद्योग प्रकल्प समजून घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांना तुती लागवडीपासून ते रेशीम अळीच्या वाढीच्या विविध अवस्था व त्या अवस्थांमध्ये त्यांना कशाप्रकारे खाद्य दिले जाते याविषयी सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांना घरबसल्या जोडधंदा उपलब्ध करून देणारा हा रेशीम उद्योग शेतकऱ्यांनी जरूर करावा असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ...