"ज्ञानसंवर्धिनी प्रशालेत इंटर्नशिप कोर्स प्रमाणपत्र वितरण संपन्न"
शिरवळ(वार्ताहर):
ज्ञानसंवर्धिनी उच्च माध्यमिक विद्यालय, शिरवळ येथे इयत्ता अकरावी (वाणिज्य) विभागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या व्यावसायिक शिक्षणाच्या इंटर्नशिप कोर्सचा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न झाला. हा इंटर्नशिप कोर्स उच्च माध्यमिक विद्यालय व लेन्ड-अ-हॅन्ड इंडिया , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला होता.
इयत्ता अकरावी (वाणिज्य) मधील 18 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केले. इंटर्नशिप कोर्समध्ये विद्यार्थ्यांनी शिरवळ परिसरातील मेडिकल स्टोअर्स ,किराणामाल दुकान, कापड दुकान यांसारख्या विविध प्रकारच्या दुकानांमधून ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्ष काम करून व्यावसायिक शिक्षणाचे धडे प्राप्त केले. एकूण 80 तासांचे व्यावसायिक शिक्षणविषयक प्रशिक्षण या विद्यार्थ्यांनी घेतले. प्रशिक्षणादरम्यान आलेल्या विविध अनुभवांतून या विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाची तसेच स्वावलंबनाची वाढ होण्यास मदत झाली.
प्रमाणपत्र वितरण सोहळ्यासाठी लेन्ड-अ-हॅन्ड संस्थेचे श्री.आकाश पत्की सर, श्री. दर्शन देवकुळे सर, विभावरी वर्मा मॅडम, श्री.मयूर लाड सर , सौ.सुनंदा माने मॅडम, श्री. राज गिल्डा सर तसेच पंचायत समिती खंडाळाच्या गटशिक्षणाधिकारी सुजाता जाधव मॅडम, शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.नवनाथ मदने साहेब, ज्ञानसंवर्धिनी शिक्षण संस्थेचे सचिव श्री. रमेश देशपांडे सर , उद्योजक अनिल ढमाळ , उद्योजक जयवंत चव्हाण, उद्योजिका स्वाती तांबे , इस्माईल मोकाशी, सौ. महांगरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत संस्थेचे सचिव श्री. रमेश देशपांडे सर यांनी केले. ते म्हणाले की,"लेन्ड-अ-हॅन्डने राबविलेल्या या इंटर्नशिप कोर्समुळे विद्यार्थ्यांना उद्योजकीय कौशल्यांचा बारकाईने अभ्यास करता आला आणि प्रत्यक्ष व्यवसाय करत असताना येणारे विविध अनुभव जवळून अनुभवता आले. या उपक्रमाचा परिचय तसेच कोर्सविषयक माहिती श्री. गाढवे ए.के. यांनी उपस्थितांना करून दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. आकाश पत्की सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "महाविद्यालयीन वयातच जर विद्यार्थ्यांना अशा प्रकारची व्यावसायिक कौशल्ये शिकायला मिळाली तर ते लवकरच एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला येऊ शकतील".
श्री.दर्शन देवकुळे सर यावेळी म्हणाले की, "सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने शासकीय नोकरीच्या मागे न लागता स्वतःचे व्यवसाय उभारले पाहिजेत आणि स्वतःबरोबरच इतरांना देखील रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे" .
उद्योजक अनिल ढमाळ व जयवंत चव्हाण तसेच उद्योजिका स्वाती तांबे यांनी या कोर्सच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांबद्दल आलेले आपले अनुभव कथन केले. यावेळी उपस्थित पालक वर्गापैकी श्री. इस्माईल मोकाशी व सौ.महांगरे यांनी अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होत असल्याचे व ते नवीन कौशल्ये आत्मसात करत असल्याचे नमूद केले.
उपस्थितांचे आभार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.भोसले मॅडम यांनी मानले.