" विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास बी.एस्सी. आणि बी.कॉम. या अभ्यासक्रमांसाठी मान्यता "
इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर परिसरातील उच्चशिक्षणाची मागणी व शैक्षणिक निकड लक्षात घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून येथील विद्या प्रतिष्ठानच्या वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बी.एस्सी. आणि बी.कॉम. हे पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली आहे.
हे अभ्यासक्रम सुरू झाल्याने इंदापूर परिसरातील विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणाचे नवीन मार्ग उपलब्ध झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निर्मल साहूजी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, मूलभूत विज्ञानाच्या आणि वाणिज्य शाखेच्या शिक्षणाची आजच्या काळात खरी गरज आहे.संशोधन क्षेत्राकडे तरुणांचा ओढा वाढण्यासाठी मूलभूत विज्ञानाचे शिक्षण तर तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य शाखेचे शिक्षण गरजेचे आहे. विज्ञान ऑलिम्पियाड धर्तीच्या प्रयोगशाळा व नाविन्यपूर्ण उपक्रम हे या अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य असणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे त्यांनी आवाहन केले.